रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा

दि. १६/०१/२०२४ ते दि. १८/०१/२०२४ रोजी इयत्ता पहिलीचे प्रवेश अर्ज वाटप होणार आहेत.

• वेळ:
सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत

• प्रवेश अर्ज मिळण्याचे ठिकाण:
ऑफिस, रँग्लर र. पु. परांजपे प्राथमिक शाळा, हुजूरपागा, पुणे-३०

• प्रवेश अर्ज भरून देताना मूळ जन्मदाखला, जन्मतारखेच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत व आधारकार्डची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी.

• इ.१ लीच्या प्रवेशासाठी मुलीला ६ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

• मुलीचा प्रवेश घेतानाची जन्मतारीख ०१ ऑक्टोबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ यामधील असावी.

• प्रवेश अर्ज भरून देण्याची मुदत – दि. १७/०१/२०२४ ते दि. २०/०१/२०२४

• वेळ
सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत
(शनिवारची वेळ- ९.३० ते १२)

• प्रवेश अर्ज घ्यायला येताना मुलीच्या जन्मदाखल्याची मुळप्रत सोबत आणणे आवश्यक आहे.

• संपर्क:
मुख्याध्यापिका श्रीमती सुषमा वैद्य

• दूरध्वनी क्रमांकः
९५१८३५२८५० / ७५८८५८६०७४ / ९८५०९८५६४१

• वेळ:
सकाळी ११ ते संध्या.५.००

(प्रवेशासंदर्भात माहिती घेण्यासाठी वरील क्रमांकावर दिलेल्या वेळेतच संपर्क साधावा.)

• प्रवेश अर्ज भरून दिला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही याची कृपया नोंद घ्यावी.

शाळेचा इतिहास

दि. २९ सप्टेंबर १८८४ विजयादशमीच्या मुहूर्तावर गव्हर्नर सर जेम्स फर्गसन यांच्या हस्ते ‘हायस्कूल फोर नेटिव्ह गर्ल्स’ संस्थेचे उदघाटन झाले. दि. २ ऑक्टोबर १८८४ पासून वाळवेकर वाड्यात वर्ग सुरु झाले. दि. १७ नोव्हेंबर १८८४ मध्ये किबे वाड्यात वर्ग सुरु झाले. दि. ४ मार्च १८८५ रोजी सांगलीचे श्रीमंत तात्यासाहेब पटवर्धन यांच्या मालकीच्या ‘हुजूरपागा’ या वास्तूत शाळेच्या इमारतीची कोनशिला सर जेम्स फर्गसन यांच्या हस्ते बसविण्यात आली.
रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांनी प्राथमिक विभाग सुरु करण्यासाठी त्याकाळी पाच हजार रुपये देणगी दिली.
सन १९०७ साली प्राथमिक शाळा व मुलींना खेळण्यासाठी प्लेशेड बांधण्यात आले. प्राथमिकचे वर्ग सुरु झाले. शाळेच्या आवारात ‘आमराईत’ सन १९७८ मध्ये शाळेची नवीन इमारत बांधण्यात आली. दि. १३ जुलै १९७९ पासून आत्ताच्या वास्तूत प्राथमिक शाळा भरू लागली.
दि. २ ऑक्टोबर १९८३ मध्ये शाळेला रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा असे नाव रँ. र. पु. परांजपे यांच्या कन्या श्रीमती. शकुंतलाताई परांजपे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

शालेय उपक्रम

इयत्ता
१ ली ते ४ थी

वयोगट
६ वर्षे ते १० वर्षे

माध्यम
मराठी व सेमी इंग्रजी

शाळा प्रवेश
इयत्ता पहिलीपासून सुरु

शाळेची वेळ
दररोज सकाळी ११ ते ४.३० व शनिवारी सकाळी ९ ते १२.३०

पालकांसाठी शाळेत भेटण्याची वेळ
गुरुवार सायं. ४.३० ते ५.०० वाजता व शनिवारी दु. १२ वाजता

संपर्कासाठीचा पत्ता व फोन
६८९, नारायण पेठ, पुणे-३०.

शाळेचा संपर्क क्र. - ०२० २४४५६२९०
श्री. केदार जोशी - ७५८८५८६०७४
श्रीमती रोहिणी मुरमट्टी - ९८५०९८५६४१

ईमेल - huzurpaga1884@gmail.com

मुख्याध्यापिका
श्रीमती उन्नती जावडेकर

शिक्षक - २२
शिक्षकेतर कर्मचारी - २ लेखनिक, ३ सेवक, ३ सफाई कामगार.
एकूण विद्यार्थी - १२३७

शाळेत शिकविले जाणारे विषय
मराठी, गणित, परिसर, इंग्लिश, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण
(इयत्ता १ ली ते ४ थी चे प्रत्येकी ४ वर्ग हे सेमी इंग्रजी चे आहेत)

मागील वर्षांचे शालेय उपक्रम


उत्सव लोकशाहीचा

लहानपणापासूनच विद्यार्थिनींना राजकारणाचे, उमेदवार निवडीचे, नेतृत्वाचे गुण वृद्धिंगत व्हावेत यासाठी रँ. र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेने गुप्त मतदान पद्धतीने निवडणुका घेतल्या. स्वराज्यसभेतील नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ गुरुवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय उपाध्यक्षा भा.ज.पा. महिला मोर्चा व सेवासदन अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या माननीय डॉ. मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. नवनिर्वाचित मंत्रिमंडळास पंतप्रधान, उपपंतप्रधान, शिस्तमंत्री, अभ्यासमंत्री, तंत्रज्ञान मंत्री, आरोग्य मंत्री, पुस्तक मंत्री अशा विविध पदांचा कार्यभार पार पाडण्यासाठी शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीम.जवळेकर बाई यांनी मंत्रिमंडळास शपथ दिली. स्वराज्यसभेच्या प्रमुख श्रीम.बिना शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

त्यावेळी बोलताना मेधाताईंनी एवढ्या लहान वयात मुलींना निवडणुकीसारखे अनौपचारिक शिक्षण दिले याबद्दल शाळेचे कौतुक केले व विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले.

Lokshahi utsav Lokshahi utsav

उत्साह शिक्षणाचा, आनंद पालखीचा

|| विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला ||

|| वाळवंटी चंद्रभागेच्या, काठी डाव मांडीला ||

शाळा सुरू झाल्या आणि आषाढ महिन्यात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालख्यांनी पुण्यातून प्रस्थान ठेवल्यानंतर शालेय उपक्रमांना सुरुवात होते ती पालखीने. याचा प्रत्यय आज रॅंग्लर र. पु. परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागेतील पालखी सोहळ्याने दिला.

सकाळपासूनच शाळेतील सर्व वातावरण भक्तिमय झाले होते. विद्यार्थिनींनी पांडुरंग, रुक्मिणी, ज्ञानेश्वर, तुकाराम, सावतामाळी, नामदेव, मुक्ताबाई असा पेहराव करून आल्या होत्या. काही विद्यार्थिनी पुरुष वारकरी तर काही स्त्री वारकऱ्यांचेही पेहराव करून तुळशी वृंदावन घेऊन आल्या होत्या. पालखीचे व ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या मूर्तींचे पूजन झाल्यावर शाळेतील पालखीने प्रस्थान ठेवले आणि बाहेरच्या रस्त्यावरून संपूर्ण हुजूरपागेच्या परिसरात विठ्ठल नामाच्या गजरासह ज्ञानोबा माऊलींचा जयघोष केला.

या पालखी सोहळ्यामध्ये ग्रंथ दिंडी, वृक्षदिंडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पाच दिंड्या होत्या. विद्यार्थिनींनी त्या त्या दिंड्यांप्रमाणे फलक हातात घेतले होते. "वृक्षारोपणाचे महत्त्व" पटवून देण्यासाठी काही मुलींनी झाडांची रोपे माणसांना दिली तर "प्लास्टिकचा वापर टाळा" असा नारा देत कापडी पिशव्यांचे ही वाटप विद्यार्थिनींनी या दिंडी मधून केले.

या सर्व चिमुकल्या वारकऱ्यांचे कौतुक रस्त्यावरील सर्व माणसे करत होती. मुलींबरोबर टाळ्या वाजवत घोषणा देत होती. संपूर्ण परिसराला वेढा मारून आल्यानंतर शाळेच्या प्रांगणात छोटेखानी रिंगण झाले आणि साखर फुटाण्याचा सर्वांना प्रसाद देऊन पालखीची सांगता करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाला मार्गदर्शन माननीय मुख्याध्यापिका श्रीमती जावडेकर बाईंनी केले.

Palkhi Palkhi Palkhi

योगदिन उत्साहात साजरा..

२१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून रँग्लर र.पु.परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपागा लक्ष्मी रोड येथे इयत्ता तिसरी व चौथीच्या सुमारे ५९५ विद्यार्थिनिनी विविध प्रकारची योगासने करून मोठ्या उत्साहात योगदिन साजरा केला.

आज संपूर्ण जगाने स्वीकारलेला योगा हा भारतीय संस्कृतीत खूप जुन्या काळापासून चालत आला आहे. शालेय जीवनात लहानपणापासून अभ्यासातील एकाग्रता टिकविण्यासाठी तसेच शरीर, मन यांच्या उत्तम आरोग्यासाठी शालेय विद्यार्थ्यानी योग, आसने करणे अतिशय फायद्याचे ठरते. शाळेच्या मुख्या. मा. उन्नती जावडेकर यांनी याप्रसंगी मुलींना योगाचे महत्त्व सांगून मार्गदर्शन दिले.

Yoga Day 2023